Popular Posts

Wednesday, July 11, 2012

माझी विठाई माऊली



("आईची आषाढी एकादशी"च पुढे चालू...)

त्यामुळे आजही आषाढी एकादशी म्हटलं की तेच आठवतं. दुकानात तुळशीची माळ घेऊन जप करणे, भेळीत कोणी कांदा मागितला तर एकादशीला कांदा कापून पुन्हा हात धुवायचे नि बसायचं. वाड्यातील लहान मुलांचा गलका. जणू चहू बाजूंनी विठ्ठल अंगी झेपवत आहे!


    
       जनी म्हणाली "काळ्या मदत कर रे…" नि तो धावून जातं फिरवू लागला, ज्ञानोबा माऊली म्हणाले "ज्ञान दे रे देवराया..!" नि निवृत्तीच्या रुपात सावळा घन ज्ञानची बरसात घेऊन आला, माझा भाजीचा मळाच माझी पंढरी म्हणत राबणर्या सावतांसाठी खरंच विठू तिथे त्यांच्या ह्ृदयात येऊन राहीला नि सावत्यांच्या मळ्याची सार्थ पंढरी केली! वारकर्यांच्या भक्तिची बातच अलग! पंडीत म्हणाले, देव हवा, तर, हे शिका, ते शिका. योगीजन म्हणाले श्वास हा असा घ्या नि तसा घ्या. साधा माणूस, खरंच कमी बुद्धीचा तो, म्हणूणच तर साधा, बिचार्याला काही कळाले नाही नि असाच पडला. त्याच्यासाठी राउळीतली देवाच्या मुर्तीचे दर्शन महागले नि मग देवाला मिळवणे खरंच अवघड असते, हे प्रत्ययाला आले. खुद्द ज्ञानवातार ज्ञानोबांनाही " ज्ञानोच्चारणाचा अधिकार आहे" पुरावा द्यावा लागला. सुर्याला जाऊन म्हणावे "सिद्ध कर, तूला प्रकाशण्याचा अधिकार आहे", वायुस म्हणावे "पुरावा दे की तुला वाहण्याचा अधिकार आहे", तसे ज्ञानियांच्या राजाला विचारले "सिद्ध कर, तुला ज्ञानमिळवण्याचा अधीकार आहे..!" सोशिकतेची मुर्ती, नम्रतेची सावली, अहंकराचा वारा न लागलेला राजहंस माझा… मनी आणता तर विश्वरुप दाखवता झाला असता! पण तेही सहन केले. "अहो रुपम् , अहो ध्वनिम् " म्हणणार्या विद्वानांना पुरावे दिले. पोटासाठी भाकरी दिली नाही, तरी तापहीन मर्तंडांचे बिकट व्रत स्विकारले. त्यांचे आतडे पिळवटून निघाले ते परपीडनेच्या दुःखाने. गांजलेला "साधा माणूस." न देवळात जायची संधी ना ज्ञान मिळवण्याची संधी. प्राकृतभाषेची घुसमट. अंगावर सुंदर दिसणारे कपडे घालावेत नि त्या कपड्यांनीच आपल्यासाठी पिंजरा करून ठेवावा, आतला माणूस कैदी बनावा तशी देवाची झालेली गत. देवभाषाच देवासाठी पिंजारा झालेली. कदाचित, विठ्ठलालाच त्याच्या भक्तांची ओढ अनिवार झाली काय, तो गरजला… गरजला, तो अशा अभिनिवेशाने गरजला की जळमटं तुटली, पिंजला छिन्नविछिन्न होऊन पडला…

     कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा। चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ।।

दिव्य ज्योतीच जणू अवतरली.. दर्शयामास पर्थाय परमं रुपमैश्वरम्, चा अनुभव धरत्रीने एकदा घेतला होता कुरुक्षेत्रावरती... तद्नंतर युगांपश्चात मरहठ्ठ्यांच्या भूमीत नेवासे गावी तिने दुसर्यांदा तोच दिव्य अनुभव घेतला... यावेळी फक्त पार्थ बदलला होता. तो एका समाजाच्या रुपानं उभा होता.  "ज्ञानेश्वरी"चा जन्म झाला. किती किती वचने दिली होती ह्ृषिकेशानं, ती सारी सारी यावेळी पुर्ण केली.




यो यथा माम् प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्… तुम्हाला मी हवाय, प्राकृतात हवाय? हा मी आहे! तुम्ही गांजले आहत, काळवंडले आहात.. मी सुद्धा का गोरा राहू..? तुम्हाला रहायला घर राही, परचक्र आहे… हा मी विटेवर आलो… भजनाला साधन नाही.. ती पहा प्रचंड चंद्रभागा, ते तिचे वाळवंट… उचला ती शिंपल्याची चिपळी नि धरा ताल… जानईला माया मिळत नाही... हे पहा जने, मी हा कृष्ण झालो... तू माझी राधा... तो पहा चोखोबा ओरडतोय... "धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।" ... वेगळा का आहेस रे चोखा तू.... हा पहा मी आलो तुझ्या हाडामांसात रहायला... नाथांच्या वर्तनास शास्त्राधार नाही म्हणतायेत... हा पहा गुरुदेवदत्त म्हणून त्याच्या पाठीशी उभा ठाकलो... प्रेम नाही, सगळीकडे द्वेष नि असुया आहे, जातीची उतरंड आहे, लेकरांना माया हवी.. हा पहा मी विठा"ई" झालो… आणि ती माझी ज्ञानोबा"माऊली"… द्वेष करणारे ही माझेच नि द्वेष केला गेलेली ही माझेच… दुष्कृत: असं कोणी नाही, म्हणून मी विनाशाची भाषा करणार नाही… मग काय म्हणू म्हणाता…? मी म्हणतो "जे खळांची व्यंकटी संडो, तया सत्कर्मी रति वाढो"..! माझा संताप होतो असं नाही, पण माझं तेज सहन होणार नाही तुम्हाला, ते मीच झेलतो, माझी पाठ मीच तापवतो पण गरम गरम मांडे तुम्हाला देतो… भावार्थदिपिकेचे मंाडे, अमृतातेही पैजा जिंकणारी प्राकृताची गुळवणी सोबत आहे... ज्ञानामगे धावणार्यांसाठी निवृत्ती उभा आहे, सहनशील आईची कमी भासणार्यांसाठी मी उभा आहे ज्ञानेश्चराच्या रुपाने... भक्तीयोगाचे उदाहरण म्हणून सोपानदेव आहेत नि मनीचा  निरागसपणा  गेला नसेल तर कोवळ्यामनाची प्रफुल्ल आकाशी उडणारी माझी मुंगी मुक्ताई आहे…

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारले देवालया ।।
 नामा तयाचा किंकर । तेणे केलासे विस्तार ।।
 जनार्दन एकनाथ । ध्वज उभारिला भागवत ।
 भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥



परिसस्पर्श...


(ही दोन्ही छायाचत्रे: मित्रवर्य विश्वजीत गायकवाड , सर्व हक्क त्याच्याचकडे,  परिसस्पर्श... हे नावही त्यानेच दिले आहे.)











    खरंच, किती नशिब आहे माझे, अशा महाराष्ट्रात जन्म घेतला की जिथे सोळा वरसाचं मिसरूड न फुडलेलं पोरगं, प्रचंड मोठ्या गुहेत बसून विश्वात्मकाचं ज्ञान देतं नि वयानं पिकलेल्या कापर्या भुवईखाली चिंब ओला झालेले नयन झाकतं नव्वदीचा म्हातारा त्याच्या पायाला "माऊली, माऊली.." म्हणून आर्त मिठी मारतो..! जगाच्या पाठीवरला हा चमत्कार प्रत्येक आळंदी भेटीतमधे मानाच्या गाभार्यात कस्तुरीच्या सुगंधाचं वादळ आणतो… कस्तुरीचा सुगंध कारण, माऊलींची समाधी पाहीली की त्या दिव्य विद्वत्तेपुढे मी नतमस्तक होतो नि हरीपाठाची एक एक ओवी "अरे, ईथंच मी आहे… कुठं शोधत भिरभिरतोयेस…" म्हणत एक  सुगंधी वातावरण तयार करते नि तेच बाहेर येऊन "ताटी उघडा ज्ञानेश्वरा.." अशी मुक्ताईची हाक आठवली, की आम्ही (अजूनही..!) कसं वागतो नि कसं माऊलीलाच वाळीत टाकतो, हा विचार वादळ उठवतो…!

    अशीच प्रत्येक आषाढी एकादशी असंख्य विचारांची. पंढरपुरीच्या रायाला भजणे केवळ आंतरिक आनंद नाही, ना केवळ अध्यात्मिक, तर आईच्या एकादशीला दुकानासाठी कांदाकापणर्या हातांचा किंचीत कांद्याचा वास लागलेल्या जपमाळेने शिकवलेला कर्मसिद्धांत आहे, माऊलींच्या पसायदानातील ओवीन् ओवीमधे भरलेला सामाजिक जाणिवेचा नि सोशिक ऐक्याचं (अस्फुट… कारण अजूनही आम्ही ते नीट ऐकलंच नाही..!) उच्चारण आहे, तुकोबा-नाथांनी दिलेल्या शिकवणूकीचा पुनरुच्चार आहे… हरीभेटीचा सोहळा तर तो आहेच आहे, पण कुठेतरी भगवंताने गीता सांगितल्यानंतर, आमच्यावर आलेल्या शिकवणूक आचरणात आणायच्या जबाबदारीची ती एक आठवणही आहे…!

।। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ।।





(विश्वाची सोडून इतर छायाचित्रे गुगल काकांकडून घेतली आहेत. त्यांच्या त्यांच्या हक्कधारकांचे आभार)

2 comments: