Popular Posts

Wednesday, July 11, 2012

आईची आषाढी एकादशी


  
दहा-एक दिवसांपुर्वी आषाढी एकादशी झाली. विठ्ठलाचे भक्त  विठूमाऊलीला कडाडून भेटून, भौतिकतेकडे माघारी परतू लागले. प्रत्येक वेळी पंढरीची वारी सुरू झाली की मन थरारून ऊठते. खरं सांगायचं तर, माझ्या आजोबांनंतर कोणी वारी केली नाही. मी कधी वारीसोबत दिवे घाटातही गेलो नाही, ना कधी पंढरपुर-आळंदीला, अगदी देहूला सुद्धा आषाढी एकादशीला गेलो नाही. आईला आमच्या शाळा-कॅालेजाची नि करियरची जास्त काळजी होती (तिथे एकही खाडा केला नाहीये!). मला चिपळ्या वाजवता येत नाही, माझं मृदुंग वाजवणं हे मृदुंग बडवणं असतं. म्हणून मोठ्या नशिबवान लोकांना मिळतात तसे वारीमधे सामिल होणे, वारकर्यांच्या त्या अथांग भक्तिसागरात सामिल होणे, आषाढी एकादशीच्या महापवित्र मुहुर्तावर काळ्यासावळ्या विठाईचे दर्शन होणे असा एकही प्रसंग, जो मनाच्या देव्हार्यामधे कायमसाठी धुपारती करीत नि फुलपाकळ्या-तुळशीने अभिषेक करीत ठेवता येईल, माझ्यासोबत अजूनतरी घडला नाहीये. पण, मला एकादशीची हुरहुर माझ्या मध्यमवर्गिय घरातील भाबड्या एकादशीची आथवण करून देते. आम्ही सगळे माळकरी. वारी सुरू झाली की घरात साकळचा हरिपाठ बाबा मोठ्यांदी म्हणतात. एरवी सार्यानी आपपाल्या सोईने झोपाने, पण याकाळ मात्र पहाटे उठायचं बंधन. घरच्या विठ्ठलाच्या मुर्तीला एरवी केवळ अष्टगंध. पण या काळात, वेळ मिळाला की आत्याने पाठवलेल्या चंदनाचे एखाद-दुसरे बोटही उमटायचे. विठोबा-रूखमाईला दोन फुले जास्तीची  मिळायची. गुरुपौर्णिमा, दिवाळी, शिवरात्री नि वारीचा काळ असा जयावेळी फुलवाल्या अक्काना आई ठणकावून सांगायची

 "अक्का, चार फुलं जास्तीची द्या. वर्षभारात दोन-तिनदाच असं सांगतो आम्ही, खातं सुद्धा नेटकं असतं. कधी सतावत नाही. आणि मग

 "अगं बाई, म्हतारीला असं सगळ्यांकडे सांगायल लागले तर बंद करायला लागेल धंदा", असं उत्तर देऊन अक्का जायच्या.

 मला वाटायचं उद्या कसं होणार. पण दुसर्या दिवशी अक्का माझ्याकडे फुलं देताना "दादा, घे! तुझ्या आईची विठ्ठलाची फुलं आहेत". ती बाबांच्या पुडी पुजेच्या भांड्यात सोडताना दिसायचे, की त्यात दोन-चार मंजिर्या नि तुलसीपत्रही आहेत! मला गंम्मत वाटायची. पण विठ्ठलावर पहिल्या तुलसी पडायच्या, त्या वाड्याच्या अरुंद बोळीत आईने जगवलेल्या वृंदावनातील तुळशीच्या!

 अक्काची तुळस बाहताना "अक्काच्या नातीचं नि मुलाचं नीट होऊ दे" असं आई कायम पुटपुटणार. बाबा गेली की, ती विठ्ठलाच्या मुर्तीजवळ खुडखुड करायची. नुसतं बोटानं लावलेला गंध तिला आवडत नाही. कायम चित्रात दिसतो, तसा पांढरा, पिंडीचा आकार नि मधे काळेशार बुक्क्याचे बोट काढआयचा तिचा हट्ट असायचा. तिला तिच्या वडलांनी शिवले होते ते कसे करायचे. पण आम्ही कितीही हट्ट केला, तरी आम्हाला तो गंध निषिद्ध! केवळ नाम. कारण, तसा गंध केवळ देवालाच लावायचा असतो, हे साधे कारण. रोज शाळेतून आल्यावर म् त्यांच्या लहानपणीच्या किर्तनाच्या-हरीपाठाच्या कहाण्या. एकादशीला तर काय, तिला तिचा वाढदिवसच असल्यासारखा वाटतो! अक्का दुपारी येतात, "घासभर का होईना तुझी खिचडी दे" असं म्हणत. बाबांचा जास्तीचा जप नि मग पोटापाण्याचे काम. आईचे काम एकच, घरी जमेल तेवढ्या लोकांना बोलवायाचे नि खिचडी, रतळ्याचा शीरा खाऊ घालायचा. कोणी गरीब, उपाशी दिसला की जवळ जाऊन खिचडी-शिरा-दुध, पाणी द्यायचे. ती स्वतः एकभुक्त. शेजारच्या बाया प्रसाद असल्यासारखं घरी येऊन खिचडी घेणार. मुलगा चौथीत नापास झाला असला की "भेळवाल्या काकुंच्या घरी जा नि खिचडी खा. जरा तरी अक्कल येईल!" असं म्हणत मुलांना आमच्या घरी धाडणार्या बायका मी पाहील्या आहेत. एकदा तर, संध्याकाळी, मी क्लासवरून घरी आलो नि पाहीले दारात प्रचंड मोठी रांग होती, लहान मुलांची. रस्ता काढत आतमधे गेलो नि पाहीले तर काय, आमच्या आईसाहेब टेबलावर बसल्या होत्या नि प्रत्येक मुलाला नाम काढून देत होत्या. मुलं-मुली सगळेजण काकू नाम औधून देतायेत म्हणून शेजारच्या वाड्यावरून आले होते, काहीजण क्लासवरून येताना मित्राने सांगितले म्हणून तसेच रांगेत लागले होते! "हे काय गं?" असं विचारलं तर "काही नाही रे! शेजारच्या विकीला नाम काढून दिला मी, दुपारी तो खिचडीसाठी आला तेव्हा न मग त्याचे मित्र पण आले. मघ आख्खा वाडा आला, मग हे सारे लोक आले. म्हटंलं मुलं आहेत, खुश होतील म्हणून नाम काढतेय नि थोडी खिचडी देतीये!" अक्षरशः मला "आवरा" झालं! रात्री मुद्दामचं तिला डिवचलं "का गं, एरवी दुकानात एक पैचं नुकसान होऊ देत नाहीस आणि आज काहीच केलं नाहीस?"। तिनं खुप छान उत्तर दिलं "दादा, मुलंच आहेत ती. मला छान वाटतं त्यांच्यात रमायला. एरवी उनडक्या करतात आज नाम लावून 'विट्टल विट्टल' म्हणतातयेत, ते दिवसभरच का होईना त्यांनी केलेलं चांगलं काम नाही का? कदाचित अशीच सुधरतील. तात्या सांगायचे की विठ्ठल तुकारामांच्या बायकोच्या मदतीला आला तो लहान मुलगा बनून आणि दामाजीचं कर्ज चुकवलं ते ही लहान मुलगा म्हणूणच. मला आपलं छान वाटतं त्याला असं लहान म्हणूण पाहणं!"

   
मला नवल वाटलं की हिला हरीपाठ माहीत नाही. ही कधी आम्हाला इतरांसोबत वारीला जाऊ देत नाही, म्हणते तेवढा वेळ अभ्यास करा, ते जास्त पुण्याचं आहे. पुण्यात वारी येते ती पहायला तिने कधी पाठवले नाही, खर्च नको म्हणून. कोणी वारकरी दारी आला तरी ती त्याला ताज्या पोळ्या देत असे, पण एखाद्या म्हातार्या नसलेल्या वारकर्याने तिला भेळ मागीतली ती नाही म्हणे. "माझा तो व्यवसाय आहे. त्या तरण्या वारकर्याने आपले पैसे कमवावे नि जिभेचा चटका पुरवावा. त्याला भुक असेल तर मी भाजी टाकते!"

  "मग म्हातार्यांना का देतेस?"

   "कारण, खुपसारे म्हातारे लोक गावाकडचे असतात. कित्येकांना जाच असतो. आपल्या गावात नाही का त्या अमुक अमुकची सुन असा असा जाच करते? त्यामुळे कितीही कडक साधना करणारा असला तरी असा पिडलेला असेल तारी अन्नाची वासना असते. नि ते खरंच इतके धनिक नसतात की विकत घेतील. तर पुरवावी आपण ती वासना. तिथं विठ्ठलापर्यंत कुठं गार्हाणं करू द्यावं त्याला भेळीसाठी..!"
   साधं सुधं लॅाजिक तिचं. 
  
एका आषाढीला, मी फर्ग्युसनमधे एकदा कार्यक्रम होता, म्हणून नाम लावत नव्हतो, एकादशीला, आणि तिने जबरदस्ती गंध लावून पाठवलं. "माळकरी आहे, याची लाच काय बाळगायची!". पण परत कधी असं केलं नाही बुवा मी!

   त्यामुळे आजही आषाढी एकादशी म्हटलं की तेच आठवतं. दुकानात तुळशीची माळ घेऊन जप करणे, भेळीत कोणी कांदा मागितला तर एकादशीला कांदा कापून पुन्हा हात धुवायचे नि बसायचं. वाड्यातील लहान मुलांचा गलका. जणू चहू बाजूंनी विठ्ठल अंगी झेपवत आहे! तिनं शिकवलं ही अशा रितीने की घरापासून कितीही दुर असलो, तरी पंढरीच्या भेटीची इ्छा झाली नि एखादा तास जास्तीचा अण्यास केला किंवा कोणा उपाशी माणसाला पोटभर खायला दिले, तरी नजरेसमोर आईचा विठ्ठल आलाय नि त्याला पुरुषसुक्ताचा अभिषेक घातलायंसं वाटतं..!



(शेवटची दोन छायाचित्रे आमचे मित्रवर्य छायाचित्रकार विश्वजीत गायकवाड यांची आहेत, सर्व हक्क त्यांचेच असून त्यांच्या परवानगीशिवाय ती वापरू नयेत.
विश्वाची सोडून इतर छायाचित्रे गुगल काकांकडून घेतली आहेत. त्यांच्या त्यांच्या हक्कधारकांचे आभार)
... हाच दुवा पुढे चालू ठेवतोय...

1 comment:

  1. वारीबद्दल आत्तापर्यंत मी खूप दंत-कथा ऐकल्या होत्या. अर्थात त्या दंत-कथा नसून भक्तीचा अफाट समुद्र होता हे प्रत्यक्षात अनुभवले या वर्षी - देहु , दिवेघाट, इंदापूर आणि पंढरपूर इथे.
    किती भाबडे आहोत आपण असे वाटून गेले मला. मुक्त हाताने दान करणारे माउली भक्त आणि वारकरी हे कोण वेगळे आहेत का ? नाही.
    आपले वैयक्तिक सुख बाजूला ठेवून २१ व्या शतकातही हे सर्वजण माणुसकीचा जिवंत धडाच जणूकाही !!
    आपणही या माणुसकीचा सहभागात सामील आहात हे वाचून अजून मुठभर मांस वाढले.

    ReplyDelete