Popular Posts

Sunday, October 24, 2010

पुण्यात पाउस पडला की




                आमच्या पुण्यात पाउस पडला की------.............. बाईक वर मित्राच्या घरी त्याच्या लग्नाच्या पूजेस निघाला असतो नि मुळशीच्या रम्य डोंगरावरून दृश्य दिसते.. डावीकडे पाषाण तलाव पावसाने चिंब झालाय नि आता तो पाउस कोथरूड काडे मोर्चा वळवतोय.वारजे, कात्रज उन्हात नाचतायेत. भिजण्यापूर्वी बावधान गाठायचे असा चंग बांधून गाडी पळवली की त्याच्या घराच्या चौकातच मेंढ्यानचा कळप रगेलपणे  गाडी अडवतो नि त्यांतून रस्ता काढता काढता पहिले स्नान घडते. पाउस तुमच्या भिजलेल्या नव्या ती शर्टकडे पाहत फिदीफिदी हसत असतो..!! मित्राकाडे गरम गरम चहा मिळतो, बाहेर रिप रिप वाजणार्या धारांच्या पार्श्व संगीतासह गप्पांचा फड रंगतो, नि तोच कोणी मोठे माणूस म्हणतो "अरे... पाउस थांबलाय घरी पळ नाहीतर पुन्हा जोरात यायाचा नि पुन्हा निघणे अवघड व्हायचे..!!"

नाखुशीने गाडीची किक मारून पुहा त्याच चौकात यायला नि तोंडावर पावसाने पुन्हा  फटके मारायला एकाच गाठ.. काय म्हणून बाहेर पडलो...माघारी गेलो तर पुन्हा कोरडे व्हा, याचा जोर ओसरायाची वाट पहा..नको..सरळ गेलेलेच बरे...!
आणि मग सुरू होतो एक मस्त अनुभव.. जर सरळ सरळ highway धरून गेलात तर काही हरकत नाही पण चांदणी चौकात लेफ्ट मारून पौड रस्त्याला लागलात तर.. पहिली गोष्ट येते... चिंब भिजलेले traffic..!! कुडकुडणाऱ्या कोंबड्यांनी खुराड्यात उब मिळावी म्हणून एकमेकांच्या जवळ येऊन गर्दी करावी तशी प्रत्येक गाडी दुसरीला चिकटलेली... एक गलेलठ्ठ माणूस नि त्याची हिरवट, थंडीने गारठलेली स्कूटर; एखादा सुकलेला कारकून व त्याची तशीच सुकट लुना; जिमखान्याचा वारसा सांगणारा,घट्ट कपडे घातलेला बजाज हंक चा मालक; आपल्या ह्रितिकला चिकटलेली बार्बरा (...फडके गेले, गाडगीळ गेले, ययाती एक साहित्यिक प्रकरण आहे म्हणून आपाले सर्वांना कळतील असे ह्रितिक नि बार्बरा मोरीच बरे..) असे सगळे जण या traffic मध्ये असतात.. खूप जवळ पण आपापल्या विश्वात..जी सारी विश्वे एकमेकाना समांतर आहेत...! अरे हो आणि पुणे असल्या कारणे ह्या सगळ्या दूचाक्यांत निष्कारण लुडबूड करणारी चार चाकी वाहने काहीतरी फालतूपणा करीत उभी असतात ना..! शिवाय पुण्याची PCMT...!! मात्र या मोठ्या वाहनांचे काम एकच, गर्दी निष्कारण वाढवणे..पुण्यात प्रवास फक्त दूचाक्याच करतात मोठी वाहने गर्दी करतात.
       ही गर्दी चुकवण्यासाठी पौड रस्ता वा कर्वे रस्ता टाळून गल्लीबोळात शिरले की समाधान मिळते.. काही क्षणाच हं.. जोवर त्या गल्लीच्या अश्या जागी आपण जात नाही की जिथून माघारी फिरणे अशक्य आहे तोवर रस्ता खूप छान नि मोकळा असतो. फक्त पाउस तो काय थोबाडीत देत असतो. पण त्या critical point ला पोचले की कळते आपण आपल्या गाडी सहित गुडघाभर पाण्यात आहोत, आजोबाजूला वळणे ही शक्य नाही, घर पाणी घुसल्याने लोकांचा लोंढाच्या लोंढा रस्त्यावर आहे, पोरांना मजा वाटतीये नि ते तुम्हालाच "काका जर बाजूला व्हा न.. माझी बोट अडकलीये तुमच्या गाडीच्या पुढच्या चाकात...".. म्हणत तुम्हास तुमच्या  यः कश्चितपणाची जाणीव करून देताहेत..!! अशावेळी एकच गोष्ट होते... ज्या कोणी हा रस्ता पहिले सांगितला त्या मित्राच्या (पुढच्या- मागच्या) सात पिढ्यांचा उद्धार होतो; जर तो आपणच शोधला असेल तर भिजलेला चेहरा पुसत कोणाच्यातरी "घो" चा उद्धार होतो..बस्स...
                                    

अस्तु.

या बोळींतून बाहेर पडून मोकळा रस्ता सापडतो. सारी हॉटेले सुनसान, टपऱ्यानवरती फक्त मालक एकटा फडके खांद्यावर घेऊन बसला असतो, std वाल्याला हमखास कोणीतरी मित्र भेटून दुकानात गप्पा तुडवीत असतो. रस्त्यावर फक्त घाबरलेले काका लोक दुचाकी चालवत असतात, एखाद्या काकू, क्वचित  ह्रितिक-बार्बरा (यांची गर्दी आत्ता highway वर गर्दी असते) परंतू एकही गोंडस व्यक्तिमत्व डीओ  किंवा activa  चालावत तुम्हाला ओव्हरटेक करत नाही.. हा खरा दुर्दैवविलास..! अशा एकट्या वेळी एखादी फेसाळती कॉफी प्यावी नि घरी जाऊन भजी खावी ही एवढीच आशा...

            एखादे छानसे हॉटेल, जे नक्कीच मोकळे असेल, त्याच्या बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांवर गार वारा लागतोय, फेसाळणारी पहिल्या कपातील गरम कॉफी शरीरात उब निर्माण करतेय, मग दुसरा कप...आज सतवायला कोणी नाही.  प्रत्येक घोटाबरोबर निवांतपणा मेंदूस आतमध्ये स्वस्थ करतोय, वरवरच्या डोक्यात काही विचार.. जे इतर वेळी आले असते तर त्रासदायक ठरले असते ते आज छतावरून पाणी ओघळू जावे तसे ते निघून जाताहेत वरच्या वर... खूप छान वाटते... माझ्या एका मैत्रिणीच्या भाषेत "लाई भारी" वाटते! तो निवांतपणा शरीराभोवती एक कोश निर्माण करतो, त्यावेळी स्वतःचे अस्तित्व जाणवते पण अहंकार जाणवत नाही, सुखी वाटते पण उन्माद येत नाही. गाडीची चावी हातात घेऊन फुटपाथवरून एक रपेट मारावी. गाडी भिजतीये, मी भिजतोय,...नि अचानक एक फूल पायाखाली येते- "सोनचाफा...." पाय थबकतो नि नजर वर जाताच ते झाड दृष्टीस पडते... सोनचाफ्याचे... जाड, हिरवी पाने, त्यावरील कोरीव शिरा, अन चमकणारी सोनेरी पांढरी फुले... माहितेय, त्याचा अशा वेळी खूप घमघमाट सुटलेला असतो. तो फक्त झाडाखाली थांबले तरच जाणवतो. काया पुलकित होणे, असा काहीतरी प्रकार त्या वेळी घडतो. खूप आठवणी उठून उभ्या राहतात, पहिल्या पासूनच; कशाच्या त्या माहित नाही, जुन्या जन्माचे नाते सांगणाऱ्या जणू... तो वृक्ष निरवपणे स्मितहास्य करीत असतो. जणू स्वतः ला बिलगायला सांगतो. त्याचे प्रत्येक फूल पाउस खुडून टाकतो, पण मजा अशी असते की कोमेजलेली फुले वृक्षावरच असतात नि खाली पडणारे प्रत्येक फूल टपोरे असते..अगदी ताजे.. त्याचा वास घ्यायचा असेल तर त्याला शेंबडे नाक न लावता त्याच्या खालील ओली माती घ्यावी.. अंगावर पडणारा प्रत्येक थेंब त्याला त्या मातीमध्ये कुजवत असतो नि प्रत्येक थेंबाला ते स्वतः चा सुगंध देते... तोच सुगंध त्या मातीत उतरलेला असतो!!! सारी फुले एकमेकाची सख्खी भावंडे असल्याप्रमाणे खिदळत, फेर धरत मातीमध्ये रूतात असतात नि हसत मुखाने त्यांचा जन्मदाता वृक्ष तुमच्याकडे एकटक पाहत असतो...!!! आयुष्याच्या अल्बममध्ये सोनेरी फ्रेममध्ये लावून ठेवावे असे ते दृश्य... खिशातील चावीशी चाळा करणारा मी, चेहऱ्यावर ओघळणारा पाउस, कुतूहलाने भारलेली नजर, पाठीवर संसाराचा अहंपणा, नि समोर उभा तो सुगंधी वृक्ष..!!!